नाशिक । प्रतिनिधी
मोखाडा तालुक्यातील मोरचुंडी येथे ट्रकने दोन चिमुरडयांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारी अडीच ते साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जव्हार बाजूकडून नाशिककडे जाणा-या हिरवट फिकट रंगाच्या (क्र. एमएच ०४ जेयू १८८७) क्रमांकाच्या ट्रकने भरधाव वेगाने रोडच्या बाजूला असलेल्या दुकान फोडून विजेच्या खांबाला गाडी धडकली. मात्र तत्पूर्वी रस्त्याच्या कडेला फळे विक्रीसाठी बसलेल्या तिघांना या ट्रकने चिरडले.
या अपघातात उषा भालचंद्र वारघडे (वय १०), आरोही उर्फ भूमिका नकुल सोनार (वय ०६) या दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर हर्षदा दिनेश धोंगडे (२४), प्रदीप जनार्दन वारघडे हे दोघेही जखमी झाले आहेत. यात हर्षदा गरोदर असून या दोघांनाही तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मोखाडा येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र मार जबर असल्याने त्यांना संदर्भ सेवा देत नाशिक जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
अपघात एवढा भीषण होता कि, या चौघांना चिरडून ट्रक थेट दुकान उडवत खांबाला धडकला. दरम्यान या ट्रकवरील चालक मद्यधुंद असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी संतप्त जमावाने काही काळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र डिवायएसपी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ब्राम्हणे यांनी वेळीच घटनास्थळी पोहचत परीस्थिती नियंत्रणात आणली.