आता १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण, मनपाच्या ‘या’ केंद्रावर मिळणार लस

नाशिक । प्रतिनिधी

ओमायक्रोनचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिका हद्दीत ३ जानेवारीपासून हि कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेच्या सहा लसीकरण केंद्रासह शहरातील महाविद्यालयांत हि लस उपलब्ध असणार आहे.

कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्य व्हेरिएंटच्या प्रादुर्भाव वाढत असून त्यास प्रतिबंधक म्हणून जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने आता १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मुलांचे लसीकरण येत्या ३ जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. या वयोगटात इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शहरातील सर्व शासकीय, खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग क्लासचे सहकार्य घेण्यात येणार असल्याची माहिती, मनपाचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ०३ जानेवारी पासून मनपा हद्दीत १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच या वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सीन लस देण्यात येईल. त्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येईल. यात ०१ जानेवारी २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. या वयोगटातील मुले दहावी आणि बारावीतील असल्यामुळे यांच्या लसीकरणासाठी खासगी शैक्षणिक संस्थांचे सहकार्य मिळाल्यास लसीकरण लवकर करून मुलांना सुरक्षित करता येणार आहे.

दरम्यान या लसीकरण मोहीमेसाठी मनपाच्या लसीकरण केंद्राव्यतिरिक्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची देखील मदत घेतली जाणार आहे. शैक्षणिक संस्थांनी आपल्या शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबीर आयोजित करावे. विद्यार्थ्यांसाठी लस, औषधी, नर्स, ऍम्ब्युलन्स, डॉक्टर्स तसेच इतर वैद्यकीय सुविधांची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात येईल. पालकांच्या संमतीनेच मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरण केंद्रे

नाशिकरोड येथील नूतन बिटको महाविद्यालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, समाजकल्याण कार्यालय, सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ईएसआयएस रुग्णालय सातपूर.