नाशिक । प्रतिनिधी
नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे यांच्या हत्येतील संशयित पती संदीप वाजे याला आज इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यास ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याबाबतची पुढील सुनावणी ११ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे.
दरम्यान, काल (दि.३) रोजी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉ. वाजे यांच्या मारेकऱ्याचे नाव सांगितले होते. अतिशय पूर्वनियोजित कट रचून डॉ. वाजे यांचे पती संदीप वाजे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी (दि.२५ जानेवारी) रोजी खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहासह गाडी जाळून टाकली होती. याबाबत सविस्तर चौकशी आणि डीएनए अहवाल यांवरून पती संदीप वाजे याला अटक करण्यात आली होती.
याबाबत अधिक माहिती आणि गुन्हा कसा घडला याबाबत अधिक माहिती पुरावे गोळा करण्यासाठी वाजेला पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याची विनंती न्यायालयात केली।होती. मात्र, न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून जयदेव रिखे यांनी काम बघितले.