Home » आता घरच्या घरी मिळणार कर्करोगग्रस्‍तांना उपचार

आता घरच्या घरी मिळणार कर्करोगग्रस्‍तांना उपचार

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

वेगवेगळ्या कारणांनी कर्करोगग्रस्‍तांना शास्‍त्रोक्‍त आणि परीपूर्ण उपचारापासून वंचित राहावे लागले. ही गोष्ट हेरुन यावर्षी जागतिक कर्करोग दिनाची संकल्‍पना ‘काळजीतून उणीवा दूर करुया’ (क्‍लोज द केअर गॅप) अशी आहे. दर्जेदार उपचार मिळविणे हा रुग्‍णाचा मुलभूत हक्‍क आहे.

रुग्‍णालयातून अशी दर्जेदार सेवा रुग्‍णांना देतांना, आता अनेक कारणांनी घरीच असलेल्‍या कर्करोगग्रस्‍तांनाही आरोग्‍य सेवा मिळणार आहे. अशा रुग्‍णांसाठी एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरतर्फे ‘होम केअर’ ही अभिनव संकल्‍पना राबविण्याची घोषणा एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्‍कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा.डॉ.राज नगरकर यांनी दिली.

यावेळी डॉ.नगरकर म्‍हणाले, आर्थिक अडचणी, दळणवळणाच्‍या साधनांची मर्यादित उपलब्‍धता, माहितीचा आभाव यांसह रुग्‍णाच्‍या मनातील भिती, कुटुंब किंवा समाजाचा दृष्टीकोन आदी कारणांमुळे रुग्‍णांकडून उपचारासाठी टाळाटाळ केली जाते. किंवा इच्‍छा असून दर्जेदार उपचारापासून वंचित राहावे लागते. ही अत्‍यंत गंभीर समस्‍या असून, रुग्‍णाच्‍या जीवावर बेतू शकते. वेळीच योग्‍य उपचार मिळाल्‍याने रुग्‍णांची हेळसांड टळण्यासोबत उपचारावरील खर्चातही बचत होऊ शकते.

यासंदर्भात रुग्‍णालयातर्फे वेळोवेळी जनजागृतीवर भर दिला गेला आहे. यापुढे एक पाऊल पुढे टाकत कर्करोगग्रस्‍तांच्‍या दारापर्यंत आरोग्‍य सुविधा पोहचविण्यासाठी ‘होम केअर’ ही अभिनव योजना जागतिक कर्करोग दिनानिमित्त अवगत केली असल्‍याचे डॉ.नगरकर यांनी सांगितले.

अशी आहे ‘होम केअर’ची संकल्‍पना

या संकल्‍पनेअंतर्गत कर्करोगग्रस्‍त रुग्‍णाच्‍या घरी डॉक्‍टरांची टीम उपचार पुरवेल. शक्‍य त्‍या चाचण्या घरी करतांना उपचारही घरीच उपलब्‍ध केला जाईल. सोबतच डॉक्‍टरांचा सल्‍ला, ड्रेसिंग, फिजिओथेरेपी, आहराविषयी मार्गदर्शन यासह कर्करोगमुक्‍त रुग्‍णांना नंतर उद्‌भवणार्या समस्‍यांचे निराकरण या टीमच्‍या माध्यमातून केले जाईल. केवळ आवश्‍यकता भासली तरीच रुग्‍णाला रुग्‍णालयात बोलविले जाईल. सध्या ही योजना शहरी भागातील रुग्‍णांकरीता उपलब्‍ध असेल.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!