सुरगाणा । प्रतिनिधी
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथील अर्थशास्त्र विभाग आणि एम.जी. व्ही. अर्थशास्त्र अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सि.जी. दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा शहरातील बाजार समिती अंतर्गत येणारी खाजगी धान्य खरेदी कशा पद्धतीने होते, हे समजून विद्यार्थ्यांची एकदिवसीय शैक्षणिक भेट घेण्यात आली.
यावेळी व्यापारी उत्तमचंद पगारिया यांनी विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांकडून विविध धान्य तसेच तेलबिया वर्गीय खरेदी त्यामध्ये भात, नागली,वरई, उडीद, तूर,भुईमुंग, सूर्यफूल यांची खरेदी कशा पद्धतीने होते, याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सुरगाणा येथे शासकीय धान्य खरेदी अंतर्गत फक्त भाताची खरेदी केली जाते. भात सुद्धा एक नंबर कॉलिटी चाच खरेदी केला जातो. मात्र पावसामुळे जर भाताचे नुकसान झालेले असेल तर असा भात शासकीय धान्य खरेदी अंतर्गत खरेदी केला जात नाही. तसेच इतर धान्य या शासकीय खरेदी मध्ये केली जात नाही. त्यामुळे सुरगाणा येथील शेतकऱ्यांना धान्याची विक्री व्यापाऱ्यांना करावी लागते.
तसेच शासकीय धान्य खरेदी मधील भातापेक्षा जास्तीची किंमत व्यापारी देत असल्याने शेतकरी जास्तीत जास्त शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना विकतात. व्यापारी धान्य खरेदी केल्यानंतर बाजार समितीला एक टक्का कर भरतात .खाजगी व्यापारी अनेक असल्याने स्पर्धेमध्ये ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांना किंमत देण्याचा प्रयत्न करतात .त्यामुळे निश्चितच खासगी व्यापाऱ्यांच्या स्पर्धेचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि शेतकरी त्यांचा जास्तीत जास्त शेतमाल हा खासगी व्यापाऱ्यांना विकतात. खासगी व्यापाऱ्यांना असणारे सरकारची विविध बंधने कमी करून सरकारने खाजगी व्यापारी जास्तीत जास्त मुक्त स्पर्धा कशा पद्धतीने करतील यासंदर्भात बाजार समितीच्या कायद्यांमध्ये बदल करून मुक्त स्पर्धेला वाव देणे गरजेचे आहे. असे केल्यास निश्चितपणे शेतकऱ्यांचा फायदा होईल असेही ते म्हणाले. सुरगाणा भागात भातावर प्रक्रिया करणारी एकही मोठी मिल नाही.
तसेच वरई पासून भगर तयार करणारी सुद्धा मिल नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना इथून भात आणि वरई ही गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी पाठवावी लागते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो. सरकारने जर सुरगाणा भागात भात आणि वरई वर प्रक्रिया करणारे उद्योग याला प्रोत्साहन दिले तर सुरगाणा भागाचा विकास होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनील घुगे यांनी केले तर आभार प्रा. एम. झेड. चौधरी यांनी मानले. यावेळी अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.