अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत मिळतेय निकृष्ट जेवण

नाशिक । प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरीच्या अनुदानित निवासी आदिवासी आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट पद्धतीचे जेवण दिला जात असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेच्या पाडाधिकाऱ्यानी केला आहे. त्यामुळे येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे जवळ पिंपरी येथील अनुदानित आश्रम शाळेची हि परिस्थिती. या शाळेत पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण दिले जाते. आजूबाजूच्या परिसरातील हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. मात्र सद्यस्थितीत या शाळेची अवस्था दयनीय झाली आहे. विद्यार्थ्यांना पोषक वातावरण असले तरी पोषकी अन्नही महत्वाचे असते. या ठिकाणी परिस्थिती उलट असून येथील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिले जात असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच संपुर्ण आश्रमशाळेत घाणीचं साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे श्रमजीवींच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. येथील स्नानगृहे आणि शौचालयाची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांना अशातच राहावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येथील श्रमजीवी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांचे जेवण चालू होते. यावेळी त्यांना जेवण निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांशी विचारपूस केली असता, अशाच प्रकारे जेवण दिले जात असल्याचे सांगितले. एकीकडे शासन विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर लक्ष ठेवून असताना अशा पद्धतीने अनुदानित आश्रमशाळांत प्रकार घडत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना एकाच खोलीत विद्यार्थ्यांना रहावे लागत असून तिथेच अभ्यास करावा लागत आहे. लाखो रुपयांचे अनुदान लाटूनदेखील आश्रमशाळा चालकांचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा कोंडमारा होत असून विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीला जबाबदार कोण? आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आश्रमशाळा चालकांवर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.