लासलगाव विंचूरसह १६ गावांना हक्काचं पाणी मिळणार

नाशिक । प्रतिनिधी
लासलगाव विंचूरसह १६ गावांसाठी वरदान ठरलेल्या सोळा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला जलजीवन मिशन कार्यक्रमामध्ये रेट्रोफिटिंग अंतर्गत नुतनीकरणाच्या प्रस्तावास मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या नूतनीकरणास १७ कोटी ५४ लक्ष रुपयांचा निधीस देखील शासनाकडून मंजुरी मिळाली असून या सोळागावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच प्रस्तावात सौर ऊर्जा प्रकल्पाचा देखील समावेश असल्याने योजनेच्या लाईटबिलाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असून योजना यशस्वीरित्या सुरु ठेवण्यात अधिक मदत होणार आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय मान्यतेची प्रत १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समितीकडे सुपूर्त केली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच तथा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, पांडुरंग राऊत यांच्यासह पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव, विंचूरसह सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात सन २०१० पासून कार्यान्वित करण्यात येऊन सदर योजना सन २०१२ साली संयुक्त पाणी पुरवठा समितीकडे देखभालदुरुस्ती व योजना यशस्वीरित्या चालविण्यासाठी हस्तांतरित करण्यात आलेली होती. सदर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या सोळा गावांसाठी अतिशय उपयुक्त योजना ठरली आहे. सदर योजनेची पाईप लाईन जुनी झाल्याने अनेक ठिकाणी लिकेजचा सामना करावा लागत असल्याने योजना चालविणे अतिशय कठीण बनले होते. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी सदर योजनेच्या नूतनीकरणासाठी शासनास प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार योजनेच्या नुतनीकरणास मंजुरी मिळाली आहे.

लासलगाव, विंचूरसह सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा मूळ योजना सन २०३१ पर्यंत एकूण संकल्पित ९९ हजार ९०१ लोकसंख्येकरिता मंजूर करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मुख्य दाबनलिकेसाठी ४५७ मी.मी व्यासाचे एम.एस.पाईप वारण्यात आले आहेत. एकूण लांबीपैकी साधारण ५५०० मी. पाईपलाईन जमिनी खालून टाकलेली असल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर नियमित लिकेज होते. त्यामुळे योजनेचा पाणी पुरवठा वारंवार खंडित होत होता. जलजीवन मिशन कार्यक्रमामधील रेट्रोफिटिंग अंतर्गत पूरक पाणी पुरवठा योजना तयार करण्याचे व त्या प्रमाणे अंदाजपत्रके व आराखडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते.

त्यानुसार केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमामध्ये रेट्रोफिटिंग अंतर्गत वाढीव लासलगाव विंचूर व इतर १६ गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची आखणी करण्यात आली. या योजनेअंतर्गत नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन पाणी पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आलेला होता. या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असून यासाठी १७ कोटी ५६ लक्ष इतक्या निधीस मंजुरी दिली आहे. या योजनेच्या नूतनीकरणाचा प्रश्न लागला असून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे सदर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यशस्वीरित्या सुरु राहिण्यासाठी या सौर ऊर्जा प्रकल्पाची तरतूद यात करण्यात आली असल्याने विजेचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. यामुळे पाणी पुरवठा सुरळीत सुरु राहण्यास मदत होणार आहे.

या योजनेमध्ये लासलगाव, विंचूर, विठ्ठलवाडी, सुभाषनगर, विष्णूनगर, डोंगरगाव, नांदगाव, कोटमगाव, टाकळी विंचूर, बोकडदरा, धारणगाव खडक, धारणगाव विर, ब्राम्हणगाव विंचूर, पिंपळगाव नजिक, निमगाव वाकडा, हनुमाननगर या सोळा गावांचा समावेश असून योजनेच्या नुतनीकरणामुळे येथील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून कार्यान्वित झालेली १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा वरदान ठरली आहे. सदर योजनेच्या नुतनीकरणाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने या सोळागावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचा देखील समावेश करण्यात आल्याने या योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे.
-जयदत्त होळकर, सरपंच तथा अध्यक्ष सोळागाव पाणी पुरवठा देखभाल समिती.