नाशिक । प्रतिनिधी
मुंबईच्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या वाटीनेदेखील पाचशे चौरस फुटांपर्यतच्या घरांना घरपट्टीत सूट देण्याच्या हालचाली सुरु आहेत. सत्तारूढ भाजपाबरोबर विरोधी पक्षदेखील सरसावले असताना आयुक्तांनी मात्र त्यावर फुली मारली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती ठीक नाही, त्यामुळे अशा प्रकारची माफीचा कोणत्याही प्रकारचा विचार नाही, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे.
गेल्या आठवड्यात मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे चौरस फूट सक्षेत्रफळाच्या घरांचा मिळकत कर माफ केला. त्यामुळे सध्या त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. नाशिकमध्ये देखील अशी मागणी जोर धरू लागली आहे. खुद्द महापौर सतीश कुलकर्णी यांनी या संदर्भांत पत्र आयुक्तांना दिले असून त्या संदर्भातील प्रस्ताव महासभेत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे याला जोड शिवसेनेने दिली असून त्यांनी देखील असा प्रस्ताव या अगोदरच दिला असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस देखील याबाबत विचार करत असून लवकरच निर्णय घेणार असल्याचे प[पक्षश्रेष्ठीनी सांगितले.
दरम्यान या सर्व प्रकारच्या आयुक्तांची भूमिका महत्वाची असून त्यांच्यामते घरपट्टी माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. मुंबई महापालिकेची स्थिती वेगळी असून त्यांचे उत्पन्न आणि नाशिक महापालिकेचे उत्त्पन्न यांची बरोबरी होऊ शकत नाही त्यामुळे मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय जशीच्या तसा नाशिकमध्ये राबविता येणार नाही, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
नाशिक महापालिका क्षेत्रात एकूण मिळकती किती, त्यातील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतीची संख्या किती, त्यातून महापालिकेला किती घरपट्टी मिळते. आणि ती माफ केल्यास उत्पन्नावर किती परिणाम होईल? याची माहिती सादर करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.