नाशिक । प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथील महिलांच्या पाण्यासाठी चाललेल्या जीवघेण्या प्रवासानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्र्यंबकेश्वर प्रशासन अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देत पाहणी केली आहे.
त्र्यंबकेश्वरसह इतर ग्रामीण आदिवासी भागात आजही महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथील भयावह परिस्थिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. काल (दि. ०३) रोजी स्थानिक प्रशासनाने सदर ठिकाणी भेट देत पाहणी केली. त्यानंतर आता या ठिकाणी लोखंडी पूल बांधण्यात येणार असून जवळच्या शेतात विहीर देखील बांधण्यात येणार असल्याची अधिकार्यांनी दिली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत ग्रामपंचायत मधील सावरपाडा पैकी शेंद्रीपाडा येथील पाड्याची हि व्यथा. येथील महिलाना आजही दोन दोन किमीची पायपीट करून पाणी आणावे लागते. येथील नदीवर असणाऱ्या तास डोहावर लाकडी बल्ल्या टाकून जीवघेणा प्रवास करून पाणी आणावे लागत असल्याचे एका दैनिकातून लोकांसमोर आले. मात्र त्यांनतर प्रशासन खबडूं जागे झाले आणि प्रशासन घटनास्थळी पोहचले. त्यानंतर तातडीने या ठिकाणी ये जा करण्यासाठी लोखंडी पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच स्थानिक शेतकरी तुकाराम बुधा गांगोडे यांनी स्वतःचा गट क्रं. 242 मध्ये विहीरला जागा देण्यास सहमती देत लवकरच या ठिकाणी विहीर बांधण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वर पंचायत समिती अस्तित्वात असताना येथील प्रशासनाला माध्यमांद्वारे येथील भयावह परिस्थिती दाखवण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे गावे डिजिटल होत असताना आजही पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत असल्याचे पाहायला मिळते आहे. दरम्यान तासडोह शेंद्री पाडा येथे त्र्यंबकेश्वरचे गट विकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, खरशेत सरपंच यांनी भेट देत पाहणी केली.