मागील वर्षी गल्लोगल्ली जाऊन द्राक्ष विकले, या वर्षी नको रे बाबा!

नाशिक । प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले असून या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लावले जात असताना द्राक्ष उत्पादक मात्र या निर्बंधामुळे धास्तावले आहेत.

एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या राज्यासह जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात व जिल्ह्यात सध्या निर्बंध शिथिल आहेत. मात्र काही दिवसात हे निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. तर दुसरीकडे द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या द्राक्ष काढणीला आले आहेत. असे असताना लॉकडाऊन अथवा कडक निर्बंध लावण्यात आले तर द्राक्ष उत्पादकांना पुन्हा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचे वाढते संकट द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.

२०२० च्या सुमारास लाॅकडाऊन आणि अतिवृष्टी या दोन्ही संकटांना सामोरे जात, द्राक्ष शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने द्राक्ष पिकवली. मात्र मार्च महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागले अन द्राक्ष उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्या संकटातून कसे बसे बाहेर पडतो न पडतो तोच २०२१ मार्च महिन्यात दुसरी लाट आली, आणि होत्याचे नव्हते झाले. त्यावेळी अक्षरश १० आणि २० रुपये किलोने गावोगावी जाऊन द्राक्ष विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. त्यामुळे यंदाही द्राक्ष हंगाम हाताशी येण्याची वेळ जवळ आलेली आहे. अशातच पुन्हा एकदा कोरोनानी डोके वर काढल्याने पुन्हा नुकसानीला समोर जावे लागणार का? अशी धास्ती द्राक्ष उत्पादकांना आहे.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा नव्याने कर्ज काढून द्राक्ष बागेची जोपासणा करुन द्राक्ष उत्पादन घेतले. यावर्षी चांगला दर मिळेल आणि घेतलेले कर्ज फिटेल अशी त्यांना आशा आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा लाॅकडाऊन होण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच सध्या द्राक्षाचा दर खाली आला असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा येते कि काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन अथवा निर्बंध लावताना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.