किल्ले वाचवा, इतिहास वाचवा, वाघेरा किल्ल्यावर शिवकार्यची १५० वी मोहीम

नाशिक । प्रतिनिधी
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची १५० वी दुर्गसंवर्धन मोहीम नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील वाघेरा (चक्रधर) किल्ल्यावर (रविवार दि.२ रोजी) झाली. दिवसभर केलेल्या श्रमदानातून किल्ल्यावरील पूर्ण बुजलेल्या टाक्यातून माती काढून टाक्याला पुनर्जीवित केले तर दुपारच्या सत्रात राजसदरेवरील मोठ्या वाड्यात वाढलेले झुडपे काढून स्वच्छता केली. तसेच किल्ल्यावर पूर्वेस असलेल्या ढासळलेल्या द्वार व बुरुजाच्या अवशेषांत असलेल्या पुरातन हनुमान मूर्तीस बाहेर काढून तिला उभे करण्यात आले. यावेळी स्थानिक युवकांनी वाघेरा किल्ला संवर्धन मोहीम स्थापन करून किल्ला जोपासण्याचा यावेळी संकल्प केला.

नाशिक जिल्ह्यात शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने गेल्या १५ वर्षे १५० गडकोटांच्या अभ्यासात्मक अखंडित दुर्गसंवर्धन मोहिमा आज (दि २ रोजी) पूर्ण केल्या. किल्ल्याच्या माथ्यापर्यंत शिस्तबद्ध पद्धत्तीने चढत किल्ल्याची पाहणी केली. त्यात किल्ल्यावरील भुयारी मार्ग, पायऱ्यांच्या पाऊलखुणा, किल्ल्यावर असलेले २० हुन अधिक सैनिकांचे जमीनदोस्त जोते, पूर्णपणे मातीत, झुडपात बुजलेले ८ पाण्याचे टाके, किल्ल्यावर येणारा उत्तर, पूर्व मार्ग, माथ्यावरील महादेवाची पिंड, हनुमानाच्या जुन्या ३ मूर्ती, कश्यप ऋषींची तपोभूमी, कश्यप नदीचे उगमस्थान, तेथील बुजलेले पाण्याचे पाझर, जमीनदोस्त झालेला वाडा आदी ऐतिहासिक वारसा या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र या सर्वांची दुर्दशा देखील झाल्याचे निदर्शनास येते. शिवकार्य गडकोटच्या माध्यमातून आज मोहिमेदरम्यान येथील दुर्दशा झालेल्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.

वाघेरा किल्ल्याचा इतिहास पाहता वाघेरा किल्ला समुद्र सपाटीपासून ३४४४ फूट उंच,मध्यम चढाईचा आहे, किल्ला १६६२ नंतर मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ल्यावरील वास्तू बघता किल्ल्यावर ७०० पेक्षा अधिक शिबंदी होती, किल्ला सध्या ढासळलेल्या स्थितीत आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मोठी वनराई असून मात्र लाकूडतोड मोठ्या प्रमाणात आहे. किल्ला पर्यावरणीय दृष्ट्या ओसाड होत असल्याचे शिवकार्य गटकोटचे रॅम खुर्दळ यांनी सांगितले मात्र शिवकार्य गडकोटच्या माध्यमातून इतिहासाच्या पाऊलखुणा जोपासण्याचे काम करावीत आहोत.

या दुर्गसंवर्धन मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,श्रमदान समिती प्रमुख भूषण औटे, रोहित गटकळ, प्रचार कलाकार संकेत नेवकर, विकास बोडके, किरण दांडगे, सोमनाथ जाधव, बाळू बोडके, दिलीप उघडे, ऋशिकेश बोडके, निवृत्ती बोडके, गोविंदा उघडे, किशोर बोडके, वैभव बोडके, रोहित बोडके, दिलीप उघडे, संकेत बोडके, मच्छिद्र बोडके, कार्तिक पवार, यश बोडके यावेळी दुर्गसंवर्धनात सहभागी झाले होते.