कोणत्या मुहूर्तावर सरकार आलंय काय माहित – विनायक मेटे

नाशिक | प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सातत्याने महाराष्ट्रावर संकट येत आहेत, कोणत्या मुहूर्तावर हे सरकार आलंय हे माहीत नाही पण हे सरकार अपशकुनी आहे, अशी खोचक टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.

ते आज नाशकात पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सातत्याने संकट येत आहेत. कोरोना, महापूर यामुळे लोकांचे हाल झाले असून कोरोनाच्या नावाखाली शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की सरकारला दोन वर्षे पूर्ण पण या दोन वर्षात अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. हे सरकार कोणत्या मुहूर्तावर आले आहे हे माहीत नाही पण हे सरकार अपशकुनी आहे. या सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले असुम शेतकरी अजून कर्जमुक्त झाला नाही. म्हणजे विमा कंपनी आणि सरकार मध्ये मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

हिवाळी अधिवेशनावर ते म्हणाले की, घोटाळे बाहेर येतील म्हणून सरकार अधिवेशन होऊ देत नाहीये. गोंधळात कामकाज पूर्ण करण्याचा यांचा विचार असून चार दिवसांत अधिवेशन होत का? असा सवाल यावेळी उपस्थित केला. अधिवेशनाचे कामकाज किमान ६० दिवस होणे गरजेचे असताना चार दिवसांत काय होणार, हा तर लोकशाहीचा खून आहे. अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षणावर मेटे म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षण या सरकारने हिरावून घेतले आहे. शिवाजी स्मारकाचे काम अद्यापही रखडले असून दोन वर्षात सरकारने बैठक देखील घेतली नसल्याचे त्यानी सांगितले.