नाशिकच्या काही भागांत दोन दिवस पाणीबाणी ; पाणीपुरवठा राहणार बंद !

नाशिकमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. एवढेच नाही तर नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर आहे. असं असताना देखील नाशिककरांवर दोन दिवस पाणी संकट ओढावणार आहे. २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सातपूर आणि पश्चिम विभागातील काही भागात संध्याकाळच्या पाणीपुरवठा बंद राहणार असून सकाळचा २८ सप्टेंबर रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

नाशिकच्या सातपूर आणि पश्चिम विभागातील काही भागात २७ सप्टेंबरला म्हणजेच उद्या संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळचा तर बुधवारी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासुन सुरु होणारी सातपुर अशोक नगर व नाशिक पश्चिम महिंद्रा कंपनी कंपाऊंड लगत प्रभावती हॉस्पिटल समोरच्या सिमेंट पाईपलाईनला पाणी गळती सुरु झाली आहे. या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने करणे गरजेचे असल्याने आवश्यक आहे. अशी माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली आहे.

पाईपलाईन दुरुस्तीसाठी शहरातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहील अशी माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. शहरात २७ आणि २८ सप्टेंबर असे दोन दिवस पाणीबाणी राहणार आहे. पाणीपुरवठा नसल्याने अनेक नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नागरिकांनी दोन दिवस पुरेल इतका मुबलक पाणीसाठा करून ठेवावा म्हणजे वेळेवर गैरसोय होणार नाही, पाण्याचा जपून वापर करावा, पाण्याची नासाडी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठा पुन्हा लवकर सुरळीत होईल अशी देखील माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

शहरात या भागांत पाणीबाणी


पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असुन सातपूर विभागातील जुना प्रभाग ८ व १० चा संपूर्ण परिसर व प्रभाग क्रमांक ११ मधील प्रबुद्ध नगर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहिल. नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७ मधील गंगापूर रोडवरील माणिक नगर ,श्रमिक कॉलनी , गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन परिसर, विनय कॉलनी ,सहदेव नगर सुयोजित गार्डन ,दादाजी कोंडदेव नगर, शांतिनिकेतन सोसायटी, चैतन्य नगर ,आयाचित नगर निर्मला कॉन्व्हेंट शाळा इत्यादी सर्व परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.