कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट घातक का आहे?

नाशिक । प्रतिनिधी
‘ओमिक्रॉन’ या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात दहशत निर्माण केली आहे. खरे तर, तज्ज्ञांनी हा विषाणू डेल्टा पेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे म्हटले आहे, कारण हा आतापर्यंतचा सर्वाधिक म्यूटेटेड व्हर्जन असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत राज्य सरकार तातडीने बैठक घेत असून काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत डॉ शशांक जोशी यांनी हा विषाणू घातक का आहे, याबाबत माहिती दिली.

कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे. डेल्टा ची जागा ओमायक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली. यावरून त्याची घातकता लक्षात येते. दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते, पण ओमायक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत. हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ञ जाणून घेत आहेत. पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे. कारण याचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे 

डबल मास्क घालणे योग्य राहील. सर्जिकल 3 प्लाय मास्क आणि एन 95 प्रकारातील एक मास्क घालणे उचित ठरेल. खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेच अधिक संधानात बाळगणे गरजेचे आहे. आवश्यक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा, ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी ती त्वरित घ्यावी. ओमायक्रॉनला रोखण्याचा एकच मार्ग आहे – दुहेरी मास्क घाला, मोकळ्या हवेत राहा, आणि लसींचे दोन्ही डोस घ्या.

बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही बैठक बोलविण्यामागे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले. डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करून युरोप तसेच दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या विषाणूविषयी माहिती दिली. यावेळी टास्क फोर्सच्या डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी व डॉ राहुल पंडित यांनी देखील यासंदर्भात काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.