नोकरीच्या बहाण्याने महिलेला फसवून नेले लॉजवर; धक्कादायक प्रकार उघडकीस..

पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला नोकरीला लावून देण्याच्या बहाण्याने लॉजवर नेत लैंगिक अत्याचार केले त्यात आणखी धक्कादायक म्हणजे तिचे नग्न फोटो काढत ते व्हायरल करण्याची धमकी देत १ लाखांची खंडणी मागितली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरातील आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेसोबत हा धक्कादायक जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२२ मध्ये घडला आहे. महिलेला कामाची गरज होती. यातूनच आरिफ खान याने पीडित महिलेला तो तिच्या पतीचा मित्र आहे असं सांगून डंजो या ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमध्ये नोकरी लावून देतो असे सांगितले. डिलिव्हरी गर्ल म्हणून काम लावून देतो असे आमिष त्याने दाखवले.

दरम्यान, आरिफने पीडित महिलेला एक डिलिव्हरी करायची आहे असे सांगत बोलावून घेतले. त्यानंतर त्याने त्या महिलेला एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. या सगळ्या बाबत कोणाला काही सांगितले तर फोटो व्हायरल करील अशी धमकीही दिली.

एवढ्यावर न थांबता संशियत आरोपी रवी याने त्या महिलेला १ लाख रुपयाची खंडणी ही मागितली. तसेच यातील तिसरा आरोपी रियाजनेही महिलेला वारंवार धमकावले. या सगळ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आता पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे.

हे प्रकरण आता उघडकीस आले असून कोंढवा पोलिस ठाण्यात ३ जणांविरोधात भारतीय दंडात्मक कलम ३७६ (२), ५०६, ३८४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.