सातपूर येथे कामगाराचा छतावरून पडून मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी

सातपूर येथील औद्योगिक वसाहतीतील एका इंजिनिअरिंग कंपनीत काम करत असताना एका कामगाराचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

संजीव कुमार यादव असे मृत पावलेल्या कामगाराचे नाव आहे. सातपूर येथील जेबीएम इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत छताच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हि घटना घडली. यावेळी मयत युवक या कारखान्यातील सोलर सिस्टिम दुरुस्तीचे काम करत असताना तब्बल ७० फूट उंचीवरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजीव कुमार यादव तपासून मृत घोषित केले.

संजीव कुमार यादव हा मूळचा उत्तर प्रदेश अलिगड जिल्ह्यातील अरोहत्ती येथील रहिवासी होता. मात्र सध्या तो सोमेश्वर कॉलनी येथे राहत होता. मात्र आज झालेल्या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मुसळे करीत आहे.