नाशिक । प्रतिनिधी
नाशिकमधील क्रिकेट प्रेमींचे स्वप्न आता पूर्ण लवकरच पूर्ण होणार आहे. पेठ रोडजवळ ४५ एकरात भव्य क्रिकेटचे मैदान साकारण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्टेडियमचे मेकर सायनेटिकस आर्किटेक्ट यांनी दिली आहे.
नाशिकमध्ये क्रिकेट, सायकलिंग, कब्बडी, धावणे आदींसह अनेक क्रीडा प्रकारांत नाशिकच्या खेळाडूंनी नाव गाजवले आहे. अशातच नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येत आहे. २५ हजार लोकांच्या आसनक्षमतेसह, सदर स्टेडियम उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक होणार आहे. साधारण ४५ एकर परिसरात हे क्रिकेट स्टेडियम साकारण्यात येत असून यामध्ये जलतरण तलाव (All-weather Swimming Pool), अॅथलेटिक्स स्टेडियम आणि इनडोअर स्टेडियम देखील होणार आहे.
पेठरोडवरील ४५ एकर जागेत या स्टेडियमची उभारणी करण्यात येत आहे. याबाबत अद्याप नाशिक महानगर पालिकेकडून अधिकृत माहिती नसली तरी स्टेडियम बांधण्यासंदर्भात कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याकडे आहे, त्या कंपनीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबत माहिती दिली आहे. या स्टेडियमवर छताला आधार देण्यासाठी व प्रेक्षकांच्या आसनांना सावली देण्यासाठी कॅन्टिलिव्हर्ड ट्रसची (cantilevered trusses) मालिका तयार केली गेली आहे. स्टेडियमची रचना करताना, सर्व प्रेक्षकांसाठी आरामदायक आसन आणि स्पष्ट दृश्य याची देखील खात्री करण्यात आली आहे.
थोड्याच दिवसात येथे क्रिकेटच नव्हे तर इतर खेळांचा आनंदही खेळाडू घेऊ शकतील. तसेच या स्टेडिअमच्या उभारणीचे काम सुरु झाले असल्याची माहिती कॉन्ट्रॅक्ट कंपनी सायनेटिक्स आर्किटेक्ट यांनी दिली असून समस्त क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.