पंचवटी पोलीस ठाण्यातील हवालदाराची आत्महत्या

नाशिक । प्रतिनिधी

पोलीस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून कर्तव्य बजावणारे ५१ वर्षीय पोलीस हवालदार अनिल जमदाडे (रा.मानेनगर, रासबिहारी,लिंकरोड़) यांनी ओढाजवळच्या रेल्वे रुळावर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास धावत्या रेल्वेपुढे उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

पोलीस आयुक्तालयात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले जमदाडे हे गेली पाच वर्षे म्हसरूळ पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वीच जमदाडे यांची पंचवटी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. येथे ते हजेरी मास्तर म्हणून कर्तव्यावर होते.

दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येमागील निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. आडगाव शिवारातील ओढाजवळ असलेल्या रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह सायंकाळी आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला.