धनगर समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?

धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या १६ दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे अण्णासाहेब रुपनवर यांचं उपोषण सुरू आहे. मराठा समाजा पाठोपाठ आता धनगर समाज ही आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एनटी प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण आहे. परंतु एसटी प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज करत आहे.

१९८५- ८६ साली यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती. परंतु केंद्र सरकारच्या सूचीमध्ये धनगड नावाच्या जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण आहे. मात्र धनगर आणि धनगड हे दोन्ही एकच आहे परंतु अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे धनगड हा शब्द झाल्याने धनगर समाजाचे आरक्षण रखडले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील ३०० हुन अधिक तहसील कार्यालयाने राज्य सरकार ला पत्र दिल आहे की धनगड जातीचा दाखला आजपर्यंत दिला गेलेला नाही. त्यामुळे धनगड जात अस्तित्वात नसून ती धनगरच आहे परंतु अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे धनगर चे धनगड झालेले आहे.

धनगर समाजाला ST प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे.
गेल्या आठवड्याभरा पासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल सरकार घेत नसल्याने अण्णासाहेब रुपनवर यांनी बुधवार पासून पाणी पिणेही सोडले आहे. उपोषणा १४ व्या दिवशी पाणी पिणेही सोडल्याने अण्णासाहेब रूपनवर यांची तब्बेत खालावली आहे. त्यामुळे त्यांना अहमदनगर च्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनतर पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून धनगर समाजातुन तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे सुरू असलेल्या मागील आठवड्यात आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या तरुणांनी मुंडन करत राज्य सरकारचा जाहीर निषेध केला होता. या आंदोलकां काळात सात दिवसांत सरकारमधील एकही मंत्री आंदोलन स्थळी आलेले नाही त्यामुळे धनगर समाजाच्या आंदोलनाची राज्य सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचा आरोप धनगर समाजकडून करण्यात येत आहे.

मागील आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलन उपोषणामुळे अण्णासाहेब रुपणवर, सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावली आहे. सरकार धनगर समाजाच्या आंदोलनगांभीर्याने न घेतल्यामुळे धनगर समाजाकडून तीव्र निषेध केला जात आहे. असे यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिक दांगडे यांनी सांगितले आहे.

धनगर समजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकते बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी शेंडगे धनगर कृती आरक्षण समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ फलटणचे सभापती रामभाऊ ढेकळे खंडाळ्याचे सभापती राजाभाऊ धायगुडे यांच्यासह हजारो लोकांनी आंदोलन स्थळी भेट देऊन धनगर समाजाच्या मागे उभे राहून आपण उपोषणाला पाठिंबा दिला आहे. आता धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईत तातडीची बैठक बोलवली आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होणार धनगर समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार का? हे बघण महत्वाच ठरेल.