नाशिक । प्रतिनिधी
राज्यात ओमायक्रॉन (Omicron) आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच अजित पवार (Ajit Pawar) यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. राज्यातील मंत्री आमदार यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याचे समोर आले आहे. शौर्यदिनानिमित्त भिमा-कोरेगाव (Bhima-Koregaon) याठिकाणी उपस्थित असलेल्या अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांत राजकीय नेते, आमदार हे विविध लग्नसमारंभात सहभागी होताना दिसले. या लग्नसमारंभात मोठी गर्दी झाल्याचंही दिसून आले आणि हीच गर्दी कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरल्याचे दिसत आहे. जर राजकीय नेते आणि मंत्री महोदय नियमांकडे दुर्लक्ष करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांकडून नियमांचे पालन कसे होणार असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यामध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. सरकारने निर्बंध लावले असले तरी त्याचे पालन होताना दिसून येत नाही. अनेक जण मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणी करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत राज्यातील मंत्री आमदार अनेक लग्न समारंभांना हजेरी लावली आहे. यामध्ये अनेक आमदार, मंत्री विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) उपस्थित होते. या सर्व मंत्री आणि आमदारांच्या संपर्कात हजारो लोक आले आहेत. त्यामुळे ही सर्व राजकीय मंडळी कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू लागले आहेत.
राज्यातील कोरोनाचा धोका वाढत आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाच्या बाबतीत कालच राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. परंतु, कोरोनाच्या नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले.