राज्यात एकाच दिवशी कोरोनाचा उद्रेक, तब्बल ‘इतके’ रुग्ण

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात ओमायक्रोनमुळे चिंता वाढत असताना आता पुन्हा कोरोनाबाधिताची संख्या वाढत असल्याचे चित्र पाहायाला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामधील ४९० रुग्ण एकट्या मुंबईतील असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महत्वाच्या शहरातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा खबरदारी घेत आहे. त्यातच ओमायक्रोनची धास्ती देखील वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मागील २४ तासांत राज्यात १२०१ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरामध्ये ९५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून राज्यात सध्या ७३५० रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण मुंबईत आहे. त्यानंतर पुण्यात सर्वात जास्त रुग्ण आहेत. पुण्यामध्ये १९१२ रुग्ण, ठाण्यामध्ये १०३५ रुग्ण, नाशिकमध्ये ४४६ रुग्ण आणि अहमदनगरमध्ये ३५६ रुग्ण उपचाराधीन आहेत. दरम्यान, राज्यात ओमिक्रॉनने देखील चिंता वाढवली आहे. राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. देशातील रुग्णसंख्या दोनशे पार गेली आहे. या रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहे.

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९९ हजार ७६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के आहे. विशेष म्हणजे राज्यात गेल्या २४ तासांत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नाही. तर आतापर्यंत ६५ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ३५ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.