सातपूरला पोलीस स्टेशन समोर एकावर रॉडने वार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये आता सर्रास दिवसाढवळ्या हाणामारी, चोरीचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे गुन्हेगार पोलिसांना देखील जुमानत नसल्याचे समोर येत आहे. सातपूर परिसरातील खुंटवडनगर येथे दोन गटात सातपूर पोलीस स्टेशनसमोरच हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

खुटवडनगर परिसरात एकाच इमारतीत राहणाऱ्या दोन गटात सातपूर पोलीस ठाण्यासमोरच तुफान हाणामारी झाली. यात प्रशांत शिंदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केल्याने तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्यास तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस स्टेशन समोरील बस स्टॅण्डसमोर एकाच सोसायटीतील राहणाऱ्या दोन वेगवगळ्या कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. यात प्रशांत शिंदे व अभिजित वटकर हे दोघेही गंभीर जखमी झाले. यावेळी सातपूर पोलिसांनी मद्यस्थी करीत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान आता पोलीस स्टेशन समोरच गुन्हे घडत असल्याने पुन्हा एकदा नाशिक पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे नाशिक पोलीस यावर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.