आजपासून जिल्हाभरात ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’, या ठिकाणी सूट

नाशिक । प्रतिनिधी

जगभरात ओमायक्रोनने धुमाकूळ घातल्याने नाशिक प्रशासनाने आजपासून जिल्हाभरात नो व्हॅक्सिन नो एंट्री आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. यानुसार लस घेतली नसेल तर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येणार आहे, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत. त्यामुळे आजपासून या मोहिमेला सुरवात झाली आहे.

दरम्यान ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाने काही दिवसांपूर्वी या मोहिमेला सुरवात करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आजपासून ‘लस घेतली नसेल तर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नसेल, मात्र किराणा, पेट्रोल आणि इतर दुकानांत प्रवेशास हि अट नसेल, असे आदेश काढण्यात आले होते. या आदेशाची आजपासून अंमलबजावणी होत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओमायक्रोन तसेच कोरोनाला आळा बसावा यासाठी हे पाऊल उचलले असून यासाठी प्रत्येकाने लसीकरण करणे महत्वाचे असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले होते. जिल्ह्यात पहिला डोस घेण्याऱ्यांची संख्या जवळपास ४१ लाख इतकी आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या २१ लाखाच्या आसपास आहे. यामुळे दुसरा दोन घेणारे अद्यापही निम्मे लोक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नो व्हॅक्सिन नो एंट्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षितता वाढणार असून लसीकरणाला वेग येणार आहे. फेब्रुवारीत संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने जास्तीत जास्त लसीकरण होणे आवश्यक आहे. मात्र या मोहिमेत किराणा, पेट्रोल आणि इतर दुकानांत प्रवेश राहील , असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.