नाशिक । प्रतिनिधी
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला असून जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून आराखड्याची घोषणा केली जाऊ शकते, असा अंदाज मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान नाशिक महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होत असून यासाठी मनपा आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, वॉर्ड रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला असून जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून आराखड्याची घोषणा केली जाऊ शकते. तसेच मार्च २०२२ मध्ये महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
हा कच्चा आराखडा निवडणूक आयोग तपासून पाहणार आहे. त्यात त्रुटी असल्यास त्या दूर करण्यात येणार आहे, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर पालिका हा प्रभाग रचनेचा आराखडा येत्या काही दिवसांत जाहीर करणार आहे. त्यानंतर प्रभाग रचना आणि आरक्षणांच्या सोडतीवर हरकती सूचना मागविण्यात येतील. या हरकती, सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
नाशिक मनपा निवडणुकांसाठी आतापासूनच चांगले राजकारण तापले असून इच्छुकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे नाशिक शहराचे वातावरण ऐन थंडीत गरम झाले आहे. लवकरच अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या धामधुमीला सुरवात होईल, तो पर्यंत शहरातील राजकारणात विविध बदल पाहायला मिळतील यात शंका नाही.