धक्कादायक! नाशिकमध्ये वस्तीगृहातील १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी

पंचवटीत असणाऱ्या दंत महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ओमायक्रोन ची धास्ती सगळीकडे असतांना पुन्हा एकदा कोरोनाने हात पाय पसरायला सुरवात केली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरवात झाली आहे. अशातच पंचवटीतील एका वसतिगृहातील सतरा विद्यार्थिनिंना कोरोनाची लागण झाली आहे. तर येथील मुलांचे अहवाल बाकी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पंचवटीतील दंत महाविद्यालयात शिकणाऱ्या एकूण ५२ मुलींचे नमुने काल तपासणीसाठी देण्यात आले होते. हे अहवाल आज उशिरा प्राप्त झाले. यामध्ये १७ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्या मुलींना वसतिगृहात विलगिकरणात ठेवले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रशासनाने शाळा, कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र शाळा सुरू झाल्याच्या काही दिवसांनंतर जिल्ह्यातील मुंढेगाव, शहरातील एक खाजगी शाळा आणि आता वसतिगृहातील विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.