नाशिक । प्रतिनिधी
‘आई मला माफ कर, म्हणत घराच्या टेरेसवरुन उडी मारत २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिडकोतील खुटवड नगर येथे रविवारी (दि. ०२) रोजी सकाळी घटना घडली आहे.
प्रियंका आकाश पगारे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला प्रियंका आकाश पगारे रा. कृष्णा अपार्टमेंट, माहेरघर मंगल कार्यालयसमोर, खुटवडनगर येथे रहात होती. काल (दि. ०२ सकाळी साडेदहाच्या सुमारास बिल्डिंगच्या गच्चीवरून उडी मारत तिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून तिच्याकडे पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे.
दरम्यान या महिलेचे काही महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. या महिलेजवळ सुसाईड नोट मिळून आली आहे. यामध्ये म्हटलं आहे कि, ‘आई मला माफ कर,माझ्या मरणास कोणालाही कारणीभूत ठरवू नये’ असे नमूद केले आहे. घटनेनंतर प्रियंका हिला उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील दाखल करण्यात आले. मात्र डॉ. धूम यांनी तपासून मृत घोषित केले..
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचे कारण समजू शकले नाही. मात्र सुसाईड नोटमध्ये तिने स्वखुशीने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. तरीही हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या याचा तपास पोलीस करत आहेत.