मुंबई मार्गावर ‘इतक्या’ दिवसांचा मेगाब्लॉक; नाशिकरोडहून जाणाऱ्या १८ रेल्वे रद्द

नाशिक । प्रतिनिधी

रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेने कळवा ते दिवा या कॉरिडॉरदरम्यान मेगाब्लॉक घेतला आहे. हा मेगाब्लॉक जवळपास नऊ दिवसांचा असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे.

दरम्यान नवीन वर्ष सुरु होताच या मेगाब्लॉकला सुरुवात होणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून १ ते ९ जानेवारी दरम्यान मुंबईत कळवा-दिवादरम्यान रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पंचवटी, तपोवन, नंदीग्राम, जनशताब्दीसह मनमाड-नाशिकमार्गे जाणाऱ्या जवळपास १८ महत्त्वाच्या प्रवासी रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

गेल्याच आठवड्यात मुंबईपाठोपाठ नांदगाव रेल्वे स्थानकात घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला तर पंचवटी, जनशताब्दीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे या मेगाब्लॉकमुळे त्यातच एसटी संपही सुरु असल्याने आता प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

मेगाब्लॉकमुळे जालना-मुंबई-जालना अप-डाऊन जनशताब्दी एक्स्प्रेस (दि. २), मनमाड – मुंबई -मनमाड पंचवटी एक्स्प्रेस (दि. २), मुंबई-अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (दि. २ व ३), नागपूर- मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (दि. १ व २), नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस (दि. १ व २) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई-जालना जनशताब्दी अप-डाऊन (दि. ८ व दि. ९), मनमाड-मुंबई -मनमाड पंचवटी अप आणि डाऊन (दि.८ व दि.९), मुंबई -अदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (दि.८, दि.९ आणि दि.१०), नागपूर-मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस अप-डाऊन (दि ७, दि.८, दि.९, दि.१०), मुंबई-नांदेड मुंबई एक्स्प्रेस (दि.८, दि.९, दि.१०), नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस (दि.७, दि ८, दि ९) या गाड्या ट्रॅफिक ब्लॉकच्या दुसऱ्या फेजमध्ये रद्द करण्यात आल्या आहेत.