आयमा इंडेक्स २०२२ : नाशिकमध्ये २०१० कोटींची गुंतवणूक; ब्रिटनचाही समावेश

नाशिक । प्रतिनिधी
नाशिकमधील (Nashik) आयमा इंडेक्स (AIMA Index) प्रदर्शनाला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यातून एक-दोन नव्हे, तर तब्बल अडीच हजार कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात झाली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तीन उद्योगांनी ८५० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तर प्रदर्शनाच्या समारोपादिवशी तब्बल ११६० कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण २०१० कोटींची गुंतवणूक झाली आहे. याचा रोजगार निर्मितीला मोठा फायदा होणार असल्याची माहिती अध्यक्ष धनंजय बेळे यांनी समारोप प्रसंगी दिली.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित २०२२ प्रदर्शनाचा समारोप काल झाला. उन्हाचा कहर असतानाही प्रदर्शन बघण्यासाठी लोकांनी नाशिककरांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आजच्या शेवटच्या दिवशी ११६० कोटींच्या गुंतवणुकीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे एकूणच या प्रदर्शनात तब्बल २०१० कोटींची गुंतवणूक झाल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच नामांकित कंपन्यांचे अधिकारी व त्यांच्या प्रतिनिधींनी b2b अंतर्गत सर्व स्टॉल्सना भेट देऊन उद्योजकांच्या उत्पादनांची माहिती जाणून घेऊन त्यांच्या मालास योग्य न्याय कसा मिळेल, याबाबतची रणनीती त्यांना सांगितली. आणि आवश्यकता भासल्यास त्यांची उत्पादने खरेदी करण्याचे दिलेले अभिवचन हे या प्रदर्शनाचे खरे फलित म्हणावे लागेल.

विशेष म्हणजे आगामी काळात नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात तब्बल ५५०० कोटींची गुंतवणूक करून जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून ०५ हजार जणांना नोकरी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी जेएसडब्लू एनर्जी समूहाने पुढाकार घेतला आहे. हा समूह राज्यात इतर चार ठिकाणी तब्बल ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतच्या करारावरही यापू्र्वीच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. तर दुसरीकडे नाशिकमध्ये तब्बल १०० एकरवर इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात. या प्रकल्पासाठी सिद्धपिंप्री शिवारातील जागेचा विचार करण्यात येत आहे. ही योजना पूर्णत्वास गेली, तर येथे १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

आयमा इंडेक्सच्या प्रदर्शनाचे फलित म्हणजे आता ब्रिटनही (Britain) नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनचे मुंबई येथे उपउच्चायुक्त कार्यालय आहे. येथील दक्षिण आशियाचे व्यापार आयुक्त आणि पश्चिम भारताचे उपउच्चायुक्त एलेन गेमेल ओबे, फर्स्ट सेक्रेटरी बेथ येटस् यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनीही गुंतवणूक करण्यास अनुकुलता दाखवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे उद्योगनगरी नाशिकचे आकर्षण सातासमुद्रापार साऱ्यांना खुणावते आहे.

३२५ स्टॉलचे उद्दिष्ट असतानाही ३६५ हुन अधिक स्टॉल उभारावे लागले. यावरून लक्षात येते कि नाशिकमधील उद्योजकांमध्ये किती दांडगा उत्साह होता, याची प्रचीती आली. नाशिककरांनी प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी करून उद्योजकांचा आनंद द्विगुणीत केला ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. दरम्यान जिल्ह्यात तब्बल २०१० कोटींचे नवीन सहा प्रकल्प येतील आणि त्याद्वारे रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. -धनंजय बेळे, अध्यक्ष, आयमा इन्डेक्स २०२२