नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी रमेश पवार यांची नियुक्ती

नाशिक । प्रतिनिधी
मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार यांची नाशिकच्या आयुक्त पदी बदली झाली असून पवार यांनी लवकरात लवकर पदभार स्वीकारण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई महापालिका सह आयुक्त रमेश पवार हे नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होणार आहेत. याबाबतचे आदेश नुकतेच राज सरकारने दिले आहेत. यामुळे कैलास जाधव यांना मनपा आयुक्त पदाचा पदभार सोडावा लागणार आहे.

दरम्यान विधानपरिषदेत शहरात झालेला म्हाडाच्या घरांचा घोटाळा चांगलाच चर्चेत आला. तर काही दिवसांपूर्वीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वरून आयुक्तांवर आरोप केला होता. आर्थिक दुर्बल घटकातील २० टक्के घर म्हाडाकडे हस्तांतरित न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Minbalkar) यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशीसह महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश दिले.

आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीनंतर आता मुंबई महापालिकाचे सह आयुक्त रमेश पवार यांची नाशिकच्या आयुक्त पदी बदली झाली आहे. लवकरच ते नाशिक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे समजते.