Video : नाशिकची रंगपंचमी : रहाडी आणि रेनडान्समध्ये नाशिककर ‘चिंब’

नाशिक । प्रतिनिधी

तब्बल पावणे दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे निर्बंधात अडकून पडलेले नाशिककर अखेर निर्बंधमुक्त झाले आणि रंगपंचमीला नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात अक्षरश:जनसागर उसळला. रहाडी आणि रेनडान्समध्ये अवघे नाशिककर मंगळवारी (दि.२२) न्हावून निघाले. नाशिक मध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव खेळण्याची परंपरा आहे. मात्र दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंधने येत हेाती.

नाशिकमध्ये शेकडो वर्षांपासून रहाड उत्सव खेळाला जात असून शहर परिसरातील रहाड उत्सव मंडळांकडून रहाड सजवून त्यात नैसर्गिक विविध रंग, फुलांच्या पाकळ्या आणि मोठ्या प्रमाणात पाणी टाकले गेले होते. त्यानंतर विधिवत पूजा करुन या ऐतिहासिक रहाड उत्सवाला सुरुवात झाली. दरम्यान शहर परिसरातून नाशिककरांनी या रहाडीत डुबकी मारण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पारंपारीक पद्धत जोपासत हा रहाड उत्सव नाशिकमध्ये जल्लोषात साजरा केला गेला.

https://www.youtube.com/watch?v=X8w6eWZD3UM

शनि चौक, दिल्ली दरवाजा आणि तिवंधा येथील पेशवेकालीन रहाडी (हौद) खोदल्यानंतर त्यांची दुपारी मानकऱ्यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली. आणि नैसर्गिक रंगात धप्पा मारण्याचा (उड्या) आनंद मनसोक्त लुटत नाशिककरांनी रंगपंचमी साजरी केली.

रहाडीत वापरणारा रंग पाने, फुले, हळद, कुंकू यांच्या मिश्रणापासून पाच तास एका भांड्यात गरम करून तयार करण्यात आला होता. रहाडीच वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमी साजरी झाल्यानंतर ती पुरताना प्राचीन अशा असणाऱ्या बल्याचांच (सागवानी लाकडाचे मोठे मोठे ओंडके) वापर केला जातो. रहाडीत आधीच्या रंगाचे पाणी अर्ध रहाड भरलेली अशा पद्धतीने ठेवून त्यावर उसाचे चिपाड व त्यावर माती या पद्धतीने पुरली जाते.