नाशिक । प्रतिनिधी
एकीकडे राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या बूस्टर डोसला सुरवात झाली असताना नाशिक जिल्ह्यातील २२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या डोसच घेतला नसल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा जानेवारीपासून बूस्टर देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये सुरवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोसचं घेतला नसल्याचे समोर आले आहे. १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू होऊनही अद्याप जिल्ह्यातील जवळपास २२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही. याबद्दल आरोग्य विभागाने (Department of Health) चिंता व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर आता नव्याने बूस्टर डोस देखील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात २२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनीच कोरोनाच्या दुसऱ्या डोस कडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अद्याप दुसरा डोसच घेतला नसल्याने तेव्हा बूस्टर डोस हे कर्मचारी घेणार कधी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोग्य कर्मचारीच जर अस करत असतील तर सर्व सामान्य नागरिक लस घेतील का? हा देखील प्रश्न विचारला जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता ‘ओमायक्रोन’ हा नवा व्हेरिएंट आल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिबंधित लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा ठोस उपाय असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पहिला, दुसरा असे लसीचे दोन डोस नागरिकांना देण्यात आले. सध्या तिसऱ्या आणि बूस्टर डोसचे लसीकरण सुद्धा सुरु झाले आहे. यात प्रामुख्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. मात्र नाशिक जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी दुसरा डोसच घेला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वानी तात्काळ आपलं लसीकरण करून घ्यावे अस आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.