नाशिकमध्ये खाजगी कर्मचाऱ्यांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक एसटी प्रशासनाने आक्रमक पवित्र घेतला असून खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बस सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी याला प्रखर विरोध करीत आवाज उठविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटीचे कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत, त्यामुळे एसटी महामंडळाने नाशिकमधून खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पन्नास च्या आसपास खाजगी कर्मचारी दाखल झाले असून दहा ते बारा बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत. मात्र नाशिक डेपोत संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी याला कडाडून विरोध केला आहे.

दरम्यान नाशिकच्या एन.डी पटेल बस डेपोत कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातल्यानंतर अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नाशिकचे दंगा नियंत्रण पथक देखील दाखल झाले आहे. या पोलीस बंदोबस्तात बस रवाना झाल्या आहेत. मात्र खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बस सेवा सुरळीत करत असल्याने आंदोलक कर्मचारी नाराज असल्याचे दिसून आले.

दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी मध्यस्थी करत २२ एसटी कर्मचारी संघटनांना कामावर रुजू होण्यास सांगितले. त्यामुळे या सर्व संघटनांनी संप मागे घेतल्याची घोषणाही केली. मात्र नाशिकमधील कर्मचारी अद्यापही संपाच्या मुद्द्यावर ठाम असून जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत लढा सुरु राहील असे त्याचे म्हणणे आहे. मात्र या सर्वाना विरोध करीत आज एसटी प्रशासानाने नाशिकमधून खाजगी कर्मचाऱ्यांद्वारे बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत. त्यामुळे आंदोलक कर्मचारी नाराज आहेत.