नाशिक । प्रतिनिधी
प्रदूषण रोखण्यासाठी उंटवाडी तील दोंदे पूलते गोविंद नगरपर्यंत नंदिनी नदीच्या दोन्ही किनारी ६२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याला महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे नंदिनीला संरक्षक कवच प्राप्त झाले असून कचरा टाकण्यास प्रतिबंध बसणार आहे.
दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून नंदिनी नदीच्या प्रदूषणाबाबत नाशिककरांनी आवाज उठवला आहे. त्यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देण्यात येत होते. त्यानुसार आता आयुक्तांच्या मंजुरीचे पत्र स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना देण्यात आले आहे. नंदिनी नदीत परिसरातील रहिवाशी मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकतात. तसेच चिकन व मांसाचे तुकडे देखील या ठिकाणी टाकले जातात. मोठ्या प्रमाणात वाळू उपसाही होतो. याला प्रतिबंध व्हावा, नंदिनीचे अस्तित्व जपले जावे, यासाठी अनेकदा सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आली होती.
या बाबतचे निवेदन ०७ डिसेंबर २०२१ रोजी महापालिका आयुक्त कैलास जाधव, स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना देण्यात आले होते. त्याची दखल घेऊन महापालिकेने सर्वे करून सीसीटीव्ही साठी ६२ ठिकाणी निश्चित केली. त्यास आयुक्त कैलास जाधव यांनी मंजुरी दिली असून याबाबतचे पत्र व नकाशे स्मार्ट सिटी पर्यावरण विभागाने दिले आहेत. सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असे स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली आहे.
दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून नंदिनी नदीत होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा, यासाठी अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत. यासाठी नदीकाठावर वृक्षारोपण असेल, नाडीची स्वच्छता असेल, नंदिनी बचाव मोहीम असेल अशा विविध माध्यमातून ही चळवळ सुरू आहे. यामध्ये सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्ता चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्त कैलास जाधव व स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना याबाबत वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते.
तसेच नाशिकचे चंद्रकिशोर पाटील यांनी स्वतः नंदिनी काठी उभे राहून लोकांना कचरा टाकण्यापासून रोखले. याचबरोबर अनेकदा नंदिनी नदीची स्वच्छेतेबाबत जनजागृती करत स्वतः यामध्ये सहभागी झाले. तसेच नाशिकमधील पर्यावरण संदर्भात काम करणाऱ्या झटका या संस्थेने वेळोवेळी याबाबत सेव्ह नंदिनी मोहीम हाती घेत नाशिकरांना एकत्र करत मोहिमेत सहभागी करून घेतले. सेव्ह नंदिनीच्या मुद्दा सातत्याने महापालिकेच्या लक्षात आणून दिल्याने अखेर महापालिकेच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मात्र ही मोहीम कितपत यशस्वी ठरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.