शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! लवकरच नासाकाची चाके फिरणार

नाशिक । प्रतिनिधी

आर्थिक डबघाईमुळे मागील दहा वर्षापासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून नाशिक रोड येथील नामांकित बिल्डर दीपक चंदे यांच्या दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संस्थेची निविदा जिल्हा बँकेच्या प्रशासक सभेत मंजूर करण्यात आले असून तसे पत्र दीपक चंदे यांना बँकेच्या वतीने देण्यात आले आहे.

दरम्यान सन 2012 पासून पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना बंद असून कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. हा कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करावा, अशी मागणी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती. जिल्हा बँकेने ही या काळात तीन वेळा कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी निविदा काढली होती. खासदार हेमंत गोडसे यांच्या मुलाच्या संस्थेनेही कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी निविदा दाखल केली होती. ती मंजूर झाली मात्र कारखाना सुरू होऊ शकला नाही.

त्यानंतर कारखाना सुरू करण्यासाठी बँकेने ०३ मार्च रोजी पुन्हा निविदा प्रसिद्ध केली होती. दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संस्थेने तांत्रिक व व्यावसायिक निविदा सादर केली होती. जिल्हा बँकेची सोमवारी झालेल्या सभेत ठराव क्रमांक 9 अन्वये सदर निविदा मंजूर करण्यात आली असून कारखाना ताब्यात घेण्यासाठी करार करून द्यावा अशा आशयाचे पत्र दीपक चंदे यांना देण्यात आले आहे. यावेळी प्रशासन अरुण कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, प्राधिकृत अधिकारी दीपक पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान कारखाना सुरु होणार असल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कारखाना सुरू केला जाणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहेच, परंतु नियमानुसार आता बायप्रॉडक्ट सुरू करावा लागणार असल्याने येथे इथेनॉलचा प्रोजेक्ट सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे साहजिकच रोजगाराची संधी मिळणार आहे. कारखाना पूर्वस्थितीत सुरु झाला तर पाच हजार ऊसतोड कामगारांचा इतर स्थानिक ५०० कामगारांना रोजगार मिळू शकणार आहे.