नाशिकमध्ये गॅंग तयार करणाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा ‘हिसका’

नाशिक | प्रतिनिधी

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणार्‍या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील गंगापूर, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील सात सराईत गुन्हेगारांना एक व दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तसेच नाशिक आयुक्तालय हद्दीत गॅंग तयार करून गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार यांच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान हे सात गुन्हेगार सातत्याने शरीराविरूद्ध व मालाविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्या तडीपार प्रकरणाची चौकशी पूर्ण करून चौकशीअंती त्यांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्त यांनी पारीत केले आहेत.

असे आहेत तडीपार

रवींद्र माया दामोदर जाधव (२२, सातपुर), सिद्धार्थ गौतम सोनकांबळे (२५, रा.भद्रकाली), मोहम्मद अन्वर सय्यद (२७, रा.भद्रकाली), विक्की सुरज तानाजी पवार (२०, रा.भद्रकाली), अक्षय रामपाल लोट (२१, रा.भद्रकाली), करण राजू लोट (२२, रा.भद्रकाली), अर्जुन राजू लोट (२१, रा.भद्रकाली).