नाशिकच्या ‘त्या’ बलात्कार प्रकरणाची केंद्रीय पथक करणार चौकशी!

नाशिक: शहरातील म्हसरूळ परिसरातील आधाराश्रम मुलींवरील अत्याचार प्रकरणाची (Mhasrul Aadharashram rape case) गंभीर दखल केंद्र सरकारचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (Central Government by National Commission for Protection of Child Rights) घेतली आहे. त्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. राज्यभरात खळबळ उडवून टाकणाऱ्या या प्रकरणाची चौकशी हे केंद्रीय पथक (Central Squad) करणार असून यात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. पथकाने चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान, या आधाराश्रम बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी हर्षल मोरे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमातील संचालाकानेच अल्पवयीन १३ मुलींचा विनयभंग आणि ७ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक बाब मागील आठवड्यात उघडकीस आली होती. याप्रकरणामुळे आधाराश्रमात होणाऱ्या या भयावह गोष्टींकडे राज्याचे लक्ष वेधले गेले होते. आधी एका मुलीने आपल्यावरील झालेल्या अत्याचारांची वाच्यता पोलीस ठाण्यात केली आणि नंतर याची साखळीच निघाली यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली.

गुरुवारी (दि.२४ नोव्हेंबर) हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी संचालकाला अटक करत घटनेचा तपास सुरु केला. तपासात मोरे याने ७ मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात आरोपी हर्षल मोरेवर पोक्सो आणि अँट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पोलीस तपास सुरु असून न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आता या प्रकरणाची गंभीर दखल केंद्र सरकारचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे. बालहक्क संरक्षण आयोगाचे पथक नाशिकमध्ये हजर झाले असून याप्रकरणाची सखोल चौकशी हे पथक करणार आहे. या द्विसदस्यीय पथकाने आज आश्रम शाळेची पाहणी केली असून तपासाला वेग दिला आहे. केंद्रीय पथकासोबत राज्य महिला व बाल विकास आयोगाचेही सदस्य आहेत.