चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातला व्हिलन असतो; पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका

पैसे वाटणारी चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातला व्हिलन असतो अशी जहरी टीका भाजप नेत्या (BJP leader) पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे (NCP MLA Dhananjay Munde) यांच्यावर केली आहे. बीड जिल्ह्यातील (in Beed district) कौठली येथे जल जीवन मिशन योजनेच्या (Jal Jeevan Mission Yojana) शुभारंभ सोहळ्यात पंकजा मुंडेंनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. पिढी घडवणारा नेता हवा आहे की मिळवणारा नेता हवा आहे? असा सवाल यावेळी पंकजा मुंडे यांनी बीडकरांना विचारला आहे.

कौठली येथील जल जीवन मिशन योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “तुम्हाला कसा नेता हवा आहे? घरा-घरात पाणी देणारा नेता हवा आहे की, घरा-घरात चपटी देणारा नेता हवा आहे. पिढी घडवणारा नेता हवा आहे की, बिघडवणारा नेता हवा आहे?” असा सवाल करत त्यांनी उपस्थितांना साद घातली आहे. मुंडे साहेबानंतर तुम्ही सगळे माझे नाव घेता, कारण तुम्हाला चांगला नेता हवा आहे. मी निवडणूक हरले आणि तुमचे मोबाइलवरचे मेसेज बंद झाले, असे म्हणत त्यांच्या मनातील सल काढली आहे.

त्यांनी पुढे बोलताना धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, खोटे गुन्हे दाखल करणारा, तमाशा दाखवणार, मत विकत घेणारा, पैसे वाटणारी चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातला व्हिलन असतो, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.