‘होळी रे होळी..सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी’, नाशकात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने अनोखे आंदोलन

नाशिक : केंद्र सरकारने घरगुती गॅस तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्याने आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यातच नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फूटपाथवर चूल पेटवत अनोखे आंदोलन महिला कार्यकर्त्यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘होळी होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी’ असे म्हणत सरकाचा निषेध केला.

आज नाशिक शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी कडून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या फुटपाथवर महिला पदाधिकाऱ्यांकडून चूल मांडून चहा देखील बनविण्यात आला. दरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस दरवाढीचे फलक दाखवून निषेध नोंदवला.

दरम्यान गॅस दर वाढीवरून संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून निषेध नोंदविताना ‘अगोदरच महागाईने त्रस्त आहेत त्यात रोजच महागाई वाढत आहे घरगुती वापराच्या गॅसचे इंधनाचे दर वाढत आहेत सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत आहे. त्यामुळे आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे’ अशी व्यक्त करण्यात आली.

गॅस दरवाढीवरून केंद्र सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलना वेळी राणू पाटील, सुषमा पगारे, सुरेखा निमसे , कुंदा भदाणे रोहिणी महाजन, रूपाली माळी, संगीता तायडे, रूपाली पाठारे प्रमिला पवार , विद्या बर्वे, निर्मला सावंत ,दीप्ती हिरे , संगीता पाटील संगीता सानप, सविता भामरे, मनीषा. सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक शहरातील अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

या वर्षात पहिल्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पु्न्हा 50 रुपयांची वाढ झाली. १४.२ किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत (LPG Cylinder Price) आता १,१०३ रुपयांपर्यंत पोहचली आहे. गेल्या चार वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५६ टक्के दरवाढ झाली आहे. यापूर्वीच्या किंमतींवर नजर टाकली असता, सध्या हजार रुपयांत सध्या एक गॅस सिलेंडर मिळत आहे. पूर्वी एवढ्याच किंमतीत दोन गॅस सिलेंडर येत होते. महागाईच्या याच भडक्या विरोधात नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फूटपाथवर चूल पेटवत अनोखे आंदोलन महिला कार्यकर्त्यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी’ असे म्हणत सरकाचा निषेध केला..