‘औरंगजेबाची कबर हलवावी’, संजय शिरसाठ यांच्या या मागणीवर भुजबळ म्हणाले..

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात सुरु असलेल्या उपोषणावरून आता राजकीय वातावरण अधिकच पेटताना पाहायला मिळत आहे. दरम्यान यावरून प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी मोठं वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे. तर याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. त्यावर बोलताना, ‘संजय शिरसाठ काय बोलतील, काय सांगता येत नाही. ही मोठी मंडळी आहे’ असे भुजबळ म्हणाले.

काय म्हणाले संजय शिरसाठ..?

जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याने याचा सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे. त्यामुळे असे लोकं उपोषणाच्या नावाखाली शहराला वेठीस धरण्याचे काम करत आहे. शहराचे नाव बदलणे म्हणजे अत्याचारी औरंगजेबाविरोधातील हा लढा आहे. त्यामुळे याचं वाईट वाटायचं कारण काय आहे. औरंगजेबाचे तुम्ही काय वंशज आहात का? औरंगजेबाच्या कबरेचे अवशेष आमच्या येथे नको. त्यामुळे ही कबर काढून घ्यावी अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे’ असे संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर ‘संजय शिरसाठ काय बोलतील, काय सांगता येत नाही. ही मोठी मंडळी आहे’ अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे.

औरंगाबाद हे नाव बदलून शहराला आणि जिल्ह्याला ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव देण्यात आले. एकीकडे या निर्णयाचे स्वागत झाले तर दुसरीकडे त्याचा विरोध केला जात आहे. एम आय एम केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात मैदानात उतरले आहे. अशात ‘कुठलाही निर्णय सगळ्यांना पटतो अस नाही. ज्यांचा विरोध ते मोर्चे काढतात’ असे भुजबळ एम आय एमच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले. सध्या छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यावर भुजबळ बोलत होते.