जितेंद्र भावेंना पक्षातून घरचा आहेर

नाशिक | प्रतिनिधी
महिला अधिकाऱ्याविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य जितेंद्र भावे यांना भोवले असून आता पक्षाने त्यांना घरचा आहेर दिला आहे.

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे जिंतेंद्र भावे यांनी महिला शिक्षण अधिकाऱ्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना अटकही करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणातून पक्षानेच काढता पाय घेतला आहे. नाशिक येथील पदाधिकाऱ्यांनी आमचा संबंध नसल्याचे सांगितल्याने भावे बुचकळ्यात पडले आहे.

दरम्यान जिंतेंद्र भावे यांनी महापालिकेतील शिक्षण विभागाच्‍या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्‍या दालनाबाहेर आंदोलन केले होते. यादरम्‍यान वापरलेल्‍या अपशब्‍दांबाबत पक्षाने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. कुठल्‍याही महिलेचा अवमान करणे हे पक्षाचे धोरण नसून, भावे यांचा तो वैयक्‍तिक विषय असल्‍याचे पत्रकात नमूद केले आहे. या प्रकरणातून पक्षाने स्‍वतःला बाजूला केले आहे.

आम आदमीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावरून भावे यांचा निषेध केला आहे. पक्षाकडूनच भावेंच्या विरोधात पत्रक जारी केल्‍याने भावे यांना घरचा आहेर मिळाल्‍याची चर्चा आहे.