नाशिक । प्रतिनिधी
नाशिक मधील पंचवटी आगारातील जवळपास दोनशे एकोणसत्तर एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. मागील ६३ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र अद्यापही ठोस निर्णय नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही. त्यामुळे आम्हाला स्वेच्छा मरण द्यावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला एसटीचा संप अद्यापही सुरूच आहे, मात्र यावर अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांचा संताप अनावर होत आहे. तर आजपासून एसटी महामंडळाने बडतर्फीला सुरवात केल्याने नाशिकमधील संपकरी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. येथील वाहक कैलास कराड यांनी तर कार्यवाहीची पहिली ऑर्डर नाशिकमधून काढण्याचे चॅलेंजच परिवहन मंत्र्यांना दिले आहे. राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट असताना देखील राज्य सरकार याबाबत विचार करत नाहीये. त्यामुळे मरण पत्करलेले बरे, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
नाशिक येथील एसटी कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्वेच्छा मरण देण्यास सांगितले आहे. याबाबतचे निवेदन नाशिक एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात दिले आहे. ‘राज्याचे प्रमुख या नात्याने एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात येऊन आम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रासातून मुक्त करावे असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंले आहे. आतापर्यंत जवळपास २०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी या पत्रावर सह्या करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहे.
गेल्या ६३ दिवसापासून विलनीकरणाच्या मुद्द्यावरून एस टी कर्मचारी हे आपल्या संपाच्या मुद्द्यावर ठाम आहे.त्यातच आता महामंडळाकडून संपात सहभागी निलंबित कर्मचारी यांना बडतर्फ करणार असल्याची पाऊले उचलली जाणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता नाशिक मधील संपकरी एस टी कर्मचारी हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.” तुम्ही आमच्या अंगणात माती कालवाल तर येत्या पंचवार्षिकला आम्ही तुमच्या अंगणात माती कालवू “असा इशारा यावेळी या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.