जेलरोड परिसरात रिक्षा उलटली, लहान मुलीसह तीन जण जखमी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकरोड परिसरातील मिल्लत पब्लिक स्कुलबाहेर सकाळच्या सुमारास एक रिक्षा उलटून अपघात झाला. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लहान मुलीसह तिचे पालक या रिक्षाच्या कचाट्यात सापडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील जेलरोड परिसरातील कॅनॉलरोडवरील मिल्लत पब्लिक स्कूल समोर दुपारी शाळा सुटल्यानंतर पालक आपल्या पाल्यांना घेण्यासाठी आलेले असताना स्टंटबाजी करत भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ऑटो रिक्षा चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला शाळेबाहेर उभे असलेल्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.

या अपघातात हाजी चांद शहा (वय ७२), अब्दुल रझाक मन्सुरी (वय ६२), अमिना नवाज मन्सूरी (वय ७) जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, यातील हाजी चांद शहा हे डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पुढील तपास नाशिकरोड पोलिस करत आहेत. मिल्लत पब्लिक स्कूल व मिल्लत नर्सिंग होम ही शैक्षणिक व आरोग्य सेवा पुरवणारी संस्था जेलरोड परिसरातील साईनाथनगर कॅनल रोड या ठिकाणी कार्यरत आहे. कॅनॉलरोड मार्गावर सतत वाहनांची वर्दळ सुरू असल्याने शाळेसमोर रस्त्यावर सातत्याने छोटे मोठे अपघात होत असतात. त्यामुळे अनेक लोक गंभीररित्या जखमी देखील झाल्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत.