नाशिक जिल्ह्यात एसीबीचे एकाच दिवशी तीन ट्रॅप

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात मंगळवारी लाचखोरीची हद्दच झाली. वेगवेगळ्या कारणासाठी लाच मागणाऱ्या तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. पहिली कारवाई चिंचवे,ता. देवळा तर दुसरी कारवाई पेठ, तर तिसरी कारवाई नाशिक भूमी अभिलेख कार्यालय नाशिक येथे झाली. तिघांविरुध्द अनुक्रमे जिल्हा पेठ व देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवस्मारकासाठी मागितली लाच
देवळा तालुक्यातील चिंचवे येथील सरपंचाने शिवस्मारकाच्या कामासाठी लाचेची मागणी केल्याची घटना उघडकीस आली. रवींद्र पवार असे या सरपंचाचे नाव आहे. तक्रारदार यांचे शिवस्मारक उद्यान चौक सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले होते. ग्रामपंचायतीकडून काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात रवींद्र पवार यांनी मध्यस्थांमार्फत लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात लाच स्वीकारण्यासाठी आलेला इसम अलगद अडकला.

शेतजमीन मोजणीसाठी लाच

तक्रादाराने शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाशी संपर्क साधला होता. तक्रारदाराकडून यासाठी संशयित योगेश पंडित चौधरी, योगेश विजय कातकाडे यांनी नाशिक शहरातील सीबीएस येथील भूमिअभिलेख कार्यालयात लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. विभागाने खात्री केली असता ८० हजाराची मागणी केली व तडजोडीअंती ५० हजारांच्या लाचेची मागणी मेनी करून स्वीकारण्याची तयार दर्शविल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेशन सुरु करण्यासाठी मागितली लाच

महसूल विभागाच्या पेठ तहसील कार्यालयात एका अव्वल कारकुनाने आदिवासी महिलेकडे तिचे रेशन पूर्ववत सुरु करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून ती रक्कम स्वीकारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उंबरपाडा येथील महिलेने मजुराच्या रेशनकार्डमधून तिच्या पतीचे नाव कमी करत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पेठ तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे अर्ज केला होता. त्यांच्याकडून कार्कुन संशयित सुनील बोरसे याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.