मुंबई । प्रतिनिधी
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजप नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांच्या पाठीशी आम्ही आहोत, ईडीने मुंबईतील काही बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये घेतल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ईडीने हे पैसे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठविले का? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा एवढे धाडस करू शकत नाहीत, असेही पटोले म्हणाले. तसेच हे सर्व कागदपत्रे राऊत केंद्र सरकारला देणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे. त्याची चौकशीही केंद्र सरकारने करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्याचे षडयंत्र सुरु आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे ब्लॅकमेल करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे हे आम्ही वारंवार सांगितलेले आहे. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबी, एनआयएच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कारवायांमधून हे दिसून आले आहे.
सरकार पाडण्यासाठी उताविळ झालेले भाजपचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु महाविकास आघाडी सरकार भक्कम असून हे सरकार पडणार नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत. संजय राऊत यांनी आज पुराव्यासह भाजपातील नेते आणि भाजपशी संबंधित लोकांचे काळे धंदे उघड केले आहेत. घोटाळ्यांचे आरोप करणारे सोमय्यासारखे भाजपवालेच घोटाळेबाज आहेत हे आता स्पष्ट झाले आहे, असे पटोले म्हणाले.