अन्यथा… लॉन्स, मंगलकार्यालये सील करणार..!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत भर पडत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी लॉन्स आणि मंगल कार्यालय चालकांना सूचना केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सर्व मंगल कार्यालये, रिसॉर्ट आणि लॉन्सवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून लग्न समारंभ गर्दीने फुलून गेले आहेत. त्यामुळे आता त्यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत., मात्र आता यापुढे नियमांचं उल्लंघन केल्यास लॉन्स मंगल कार्यालय थेट सील करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या आहेत.

सध्या कोरोना आणि ओमायक्रॉन चा धोका लक्षात घेता प्रशासन अलर्ट झाले असून लग्न समारंभ व अंत्यविधीसाठी नियम लावण्यात आले आहेत. यामध्ये विवाहसोहळ्यांना ५० जणांची उपस्थिती तर अंत्यविधीला २० जण उपस्थित राहू शकतील असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र जर लॉन्स चालकांकडून नियमांचं उल्लंघन झाल्यास लॉन्स, मंगल कार्यालय थेट सील करण्यात येणार आहे. अशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी विक्रमी करोना बाधितांची नोंद झाली आहे. चोवीस तासांत सुमारे १३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरात सर्वाधिक ८६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, नियम पाळा कारवाई टाळा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.