राज्यात तब्बल आठ हजार नव्या रुग्णांची नोंद, ही तिसरी लाट तर नाहीयेना!

नाशिक । प्रतिनिधी
मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. राज्य सरकारने करोनाची ही वाढ रोखण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढतच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात आठ हजार ३७ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या मुंबईत ०५ हजार ४२८ नवे करोनाबाधितांची नोंद झाली होती.

दरम्यान कोरोना आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले असताना कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने हि चिंतेची बाब आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोरोनामुळे मुंबईकरांची झोप उडाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ५ हजार ४२८ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली नाही. त्यामुळे मुंबईतील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता १६ हजार ४४१ वर पोहचली आहे.

तर दुसरीकडे राज्यात एकाच दिवशी आठ हजार रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. मात्र दिलासादायक बाब अशी कि, काल ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर राज्यात १ हजार ७६६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान राज्यातील कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीमुळे तिसऱ्या लाटेला सुरवात झाली तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.