अखेर म्हाडाच्या भरती परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

नाशिक । प्रतिनिधी

गैरप्रकारामुळे रद्द झालेल्या म्हाडाच्या भरती परिक्षेचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन पद्धतीने आणि ‘टीसीएस’च्या माध्यमातून ही भरती परीक्षा होणार आहे. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. २९, ३०,३१ जानेवारी आणि १,२,३ फेब्रुवारी रोजी या परीक्षा होणार आहेत.

म्हाडातील १४ पदांच्या ५६५ रिक्त जागा भरण्यासाठी १२ ते २० डिसेंबरदरम्यान राज्यभर भरती परीक्षा होणार होती. त्यासाठी पावणे तीन लाख अर्ज आले होते. मात्र परीक्षेला काही तास शिल्लक असताना, मध्यरात्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले.

परीक्षा घेण्याचे कंत्राट असलेल्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या एका संचालकाने प्रश्नपत्रिका फोडण्याचा डाव आखला होता. पुणे सायबर पोलिसांनी कारवाई करून कंपनीच्या संचालकाला आणि दलालांना अटक केले.

या गैरप्रकारानंतर म्हाडाने स्वत: परीक्षा घ्यावात असे सरकारने जाहीर केले. त्यानुसार म्हाडाने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली असून शुक्रवारी अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.