नाशिक । प्रतिनिधी
पेठ तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी १४७ शेतकऱ्यांची फसवणूक करीत तब्बल ५० कोटींचा घोटाळा केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. कृषी विभागातील १६ अधिकाऱ्यांनी सहा वर्षांत शासनाची सुमारे ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका ट्रॅक्टर चालक असलेल्या कंत्राटदार शेतकऱ्याने थेट न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण समोर आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील हेदपाडा-एकदरे येथील शेतकरी योगेंद्र ऊर्फ योगेश सुरेश सापटे (३६) याने शासनाच्या विविध योजनांना मंजुरी मिळून तशा निविदा काढल्याचे पाहून २०११ मध्ये शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांकडे शेतीसंदर्भातील कामे मिळावीत याकरिता अर्ज केला होता. यादरम्यान सापटे यांच्याकडून निविदा भरून घेऊन, १०० रुपयांच्या कोऱ्या स्टँप पेपरवर, तिकीट लावलेल्या कोऱ्या ५० पावत्यांवर तसेच कोऱ्या धनादेशावर सह्या घेण्यात आल्या. मात्र, त्याचा गैरवापर करून, खोटी कागदपत्रे बनवून, खोटे दस्तावेज नोंदी करीत फिर्यादी योगेश सापटे याला शासनाच्या शेतीसंदर्भातील ट्रॅक्टरची कामे दिली गेली.
दरम्यान २०११ ते २०१७ या कालावधीत सापटे याच्या नावाने परस्पर ३ कोटी, १७ लाख, ४ हजार, ५०४ रुपये काढून घेतले. त्याचप्रमाणे या सहा वर्षांच्या कालावधीत पेठ तालुक्याकरिता मंजूर शासनाच्या विविध योजनांचे सुमारे ५० कोटी, ७२ लाख, ७२ हजार, ६४ रुपयांची शासनाची व इतर १४७ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत फिर्यादी योगेश सापटे यांनी पेठ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात बुधवारी (दि.५) अर्ज दाखल करीत संबंधित कृषी अधिकारी व अन्य सहकाऱ्यांनी केलेल्या ठकबाजीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली.
याप्रकरणी न्यायालयाने सापटे यांच्या अर्जाचा विचार करून पेठ पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी पेठचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप वसावे अधिक तपास करीत आहेत. मात्र, हा गुन्हा न्यायालयाद्वारे दाखल झाल्याने व या गुन्ह्यातील संशयित कृषी खात्यातील अधिकारी, सहायक, पर्यवेक्षक पदावरील व वास्तव्यास नाशिक, धुळे, जळगाव, नगर, सोलापूर येथे असल्याने गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन हे प्रकरण स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.