मोठी बातमी ! राज्यातील सर्व महाविद्यालय १५ फेब्रुवारी पर्यंत बंद

नाशिक । प्रतिनिधी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांंबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. राज्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यानुसार, राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच राज्यातील सर्व वसतिगृह देखील बंद राहणार आहेत.

मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत हि घोषणा केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन शिक्षणाकडे वळावं लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रॉन वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आलं आहे. ओमायक्रॉन बाधितांची संख्या ६५३ वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 259 रुग्ण ओमायक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल १८ हजार ४६६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ४ हजार ५५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात काल २० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६६ हजार ३०८ वर पोहोचली आहे. राज्यात ४ जानेवारीला ओमायक्रॉनचे ७० रुग्ण आढळले आहेत.