सिडकोतल्या भाईगिरीविरोधात अंबड पोलिसांचा ‘हा’ पॅटर्न

नाशिक । प्रतिनिधी

सिडको परिसरातील वावरे महाविद्यालयाजवळ काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस आक्रमक झाले असून टवाळखोरांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या सिडको, अंबड, नवीन नाशिक भागात छोटे मोठे गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक टवाळखोर स्वतःला भाई समजून येथील चौकाचौकात नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम करीत असतात. मात्र आता या उपद्रवी भाईंविरोधात अंबड पोलिसांनी कडक पाऊले उचलली असून लवकरच यांचा बिमोड करण्यात येणार आहे.

अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस नीरिक्षक भगीरथ देशमुख यांनी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी पेट्रोलिंग सुरू केली आहे. यामध्ये संभाजी स्टेडियम, पवन नगर स्टेडियम, पाटील नगर स्टेडियम, महाकाली चौक आदी विविध परिसरामध्ये टवाळखोरी करणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. तसेच अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फास्टफूडच्या गाड्यांवर अवैधरित्या मद्यपान करणाऱ्या मद्यपींना देखील चांगलाच प्रसाद दिला जात आहे.

उत्तम नगर येथे असलेल्या वावरे महाविद्यालयाच्या बाहेर टवाळखोर मुलींची छेडछाड तसेच हाणामारीचे प्रकार करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उचलला. महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे महाविद्यालय सोडून पवन नगर स्टेडियम येथे विनाकारण बसले असताना त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या पालकांना देखील पोलीस ठाण्यात बोलवुन विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. विद्यार्थ्यांनी गुन्हेगारीकडे वळू नये असा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे वपोनी देशमुख यांनी सांगितले.